बटाट्यापासून बनवता येणारे पदार्थ | Batata Make Products |

बटाट्यापासून बनवता येणारे पदार्थ | Batata Make Products |

 

 बटाट्यापासून पासून बनवण्यात येणारे पदार्थ

भारतात भाजीपाला लागवडीमध्ये बटाटा हे प्रमुख पीक मानले जाते. सर्व भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनामध्ये हे पीक अग्रस्थानी आहे. बटाटा पीक मूळचे दक्षिण अमेरिकेच्या ‘पेरू’मधील असून संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे हे कंदमूळ आहे. 

     जागतिक पातळीवर बटाटा या पिकाचे सर्वाधिक उत्पादन ‘चीन’ या देशात होते आणि त्या खालोखाल भारताचा क्रमांक लागतो. 

     बटाट्यापासून निरनिराळे पदार्थ तयार करता येतात. महाराष्ट्रात वेफर्स, पापड, चीप्स, किस करण्याचे कुटिरउद्योग आहेत. गेल्या काही काळात जागतिकीकरणामुळे प्रक्रिया उद्योगात मोठी वाढ झाली आहे. मागणी वाढल्यामुळे उद्योगही वाढत आहेत. हरियाणामध्येही वेफर्स उद्योग फार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.

आता आपण बटाट्या पासून बनणारे पदार्थ बघू

१. तळलेला बटाटा :-

यासाठी आपल्याला कच्चा बटाटा किसून घ्यायचा आहे. त्याला पाण्यात धुवून, त्यात मिरपूड , जिरेपूड, मीठ आणि लाल तिखट घालायचं. एक टेबलस्पून कॉर्न स्टार्च आणि दोन टेबलस्पून मैदा घालायचा आणि व्यवस्थित मिसळायच. मिक्स करताना पाणी अजिबात घालायचं नाही. मिश्रण घट्टसर झाल पाहिजे. जर मिश्रण पातळ वाटत असेल तर आणखी मैदा त्यात घालता येईल.

तेल गरम करून डीप फ्राय कराव लागेल. हे मिश्रण तेलात टाका २ ते अडीच मिनिटे मध्यम आचेवर तळून काढाव लागेल. असेच सर्व मिश्रण अर्धे तळून घ्या. अर्ध्या तासाने पुन्हा तेल गरम करून आणि तेल कडक तापू  द्याव. तेल चांगलं गरम झालं की मग हे अर्ध तळलेल मिश्रण त्यात सोडा. दीड ते दोन मिनिटे लालसर रंग येईपर्यंत तळा. आणि काढून घ्या. हे खूप म्हणजे खूप कुरकुरीत होतात. 

 

२. बटाटा कटलेट:-

बटाटा कटलेट आपण सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकतो. पावसाळ्यात असले पदार्थ तर हवेच हवे चहाबरोबर.

बटाटे उकडून, कुस्करून घ्या. एक कप पोहे लागतील. पोह्याना मिक्सरमधून बारीक पावडर प्रमाणे बनवा आणि बटाट्याच्या मिश्रणात टाका. आता त्यात मिठ, चाट मसाला, लाल तिखट, जिरेपूड घाला आणि मिसळून घ्या.

मग या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा  आणि त्यांना थोडा  लांबुळका आकार द्या. दिसायला भारी दिसतात. मग डीप फ्राय करा. नेहमी करतो तसे न करता डबल फ्राय करा. रिझल्ट आणखी भारी येतील. चहाबरोबर हा पदार्थ म्हणजे स्वर्गच जणु.  

 

३. बटाट्याचे  धिरडे  :-

आपण एखादं पीठ वगेरे वापरून धिरडे बनवतो ना त्याच प्रकारे हा बटाट्याचा चिला म्हणजेच धिरडे बनवता येईल.

कृती :-

दोन कच्चे मोठे बटाटे घेऊन त्यांची साल काढून घ्या. आणि बारीक किसणीने दोन्ही बटाटे किसून घ्या. किसलेले बटाटे एका भांड्यात घेऊन त्यात पाणी टाका आणि तो किस व्यवस्थित धुवून घ्या ज्यामुळे एक्स्ट्रा स्टार्च निघून जाईल. नंतर तो किस एका भांड्यात घेऊन त्यात एक मोठा चमचा बेसन पीठ आणि दोन मोठे चमचे कॉर्न स्टार्च टाका. मग अर्धा चम्मच जिरा,अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट , किंवा हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता. आमचूर पावडर किंवा चाट मसाला असल्यास तोही घालू शकता. त्याच चमच्याने एकदोन चमचे पाणी टाका. मिश्रण ओलसर हवंय पण पातळ नाही.

तवा गरम झाल्यावर त्यावर पाणी शिंपडून ते पाणी कापडाने पुसून घ्या. ही छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट आहे. याने तव्याचं तापमान नियंत्रणात राहतं. आता तव्यावर थोडसं तेल टाका आणि त्यावर आपलं बटाट्याचं मिश्रण टाका आणि त्याला थोडसं गोलाकार पसरवा. झाकण ठेऊन पाच मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या. नंतर झाकण काढून बाजूने थोडंसं तेल टाका आणि दोन मिनिटे उघड्यावर शिजू द्या. लालसर रंग आला की झालं !!!!

 

४. उकडलेली बटाटा टिक्की :-

 

साधारणतः बटाटा  टिक्की तळली जाते पण ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायची असल्याने सकाळीच एखादा तळलेला पदार्थ खाणे तितकेसे योग्य नाही म्हणून वेगळ्या प्रकारे बनवता येईल.

बटाटे आधी उकडून घ्यावे लागतील. त्यानंतर किसणीने किसून घ्यायचे आणि त्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरेपूड, धणेपूड, मीठ आणि चाट मसाला घालून ते मिश्रण मिसळून घ्यायचं, मिश्रणाचा गोळा करून घ्यायचा. 

त्याचे छोटे छोटे लिंबा एवढे गोळे करायचे आणि करताना तळहाताला तेल लावून घ्यायचे, तूप किंवा सोप्यात सोपं पाणी लाऊन त्या छोट्या गोळ्याला थोडासा चपटा आकार द्यायचा. टिक्कीसारखा. आता इडली पात्राला थोडा वेळ गरम करायला ठेवा, प्रिहीट ज्याला आपण म्हणतो. मग त्यात एका ताटात या सर्व टिक्की ठेवा आणि पंधरा मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करून एकदोन मिनिटे तापमान थोडंसं कमी झालं की टिक्की काढून घ्यायच्या आणि आवडत्या सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करायच्या.

बरं ही पद्धत जर नको असेल आणि तळूनही नको असतील तर शॅलो फ्राय करू शकता. म्हणजेच तव्यावर थोड्याशा तेलात फ्राय करता येतील. ही पद्धत सुद्धा सोपी आहे.

 

५. बटाट्याचे रोल :-

 यासाठी आपल्याला ब्रेडच्या स्लाइस घ्याव्या लागतील. दोन बटाटे उकडून किसून घ्यायचे. त्यात दोन मिरची, थोड जिरं,एक चमचा लिंबाचा रस, धना पावडर, थोडी हळद आणि चवीपुरत मीठ मिक्स करून, मिक्सरवरून थोड बारीक वाटून घ्यावं. हे मिश्रण बटाट्यामध्ये मिक्स करून त्याचे छोटे छोटे घोळे बनवून घ्यावेत. त्यानंतर ब्रेडच्या स्लाइसला थोड पाणी शिंपडून ओलसर करून घ्यावी. त्या ओलसर स्लाइसवर बटाट्याचे मिश्रणाचा गोळा ठेवून ते गोल किंवा लंबगोल आकारात बंद करून घ्यावे. नंतर हे घोळे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता.  

 

६. रवा बटाटा स्नॅक्स:-

 

बटाटे, शिमला मिरची, कांदा आणि गाजर अश्या इतरही काही भाज्या घेऊन बटाटे आणि गाजर किसून घ्या आणि शिमला आणि कांदा बारीक कापून घ्या. सर्व एकत्र करून एक टेबलस्पून मीठ टाकून मिक्स करा. कारण मीठ टाकल्याने भाज्यांना पाणी सुटेल. आता त्यात हळद, लाल तिखट, चाट मसाला, आमचूर पावडर, धणेपूड, जिरेपूड घाला. आता थोडा थोडा करत त्यात रवा टाका. आधी एक चमचा टाका व्यवस्थित मिसळा, मग पुन्हा एक चमचा टाका तोही व्यवस्थित मिसळून घ्या. असं करत करत एक वाटी पूर्ण रवा त्यात टाका. आधी हे मिश्रण खूप सुकं सुकं वाटेल म्हणून लगेच त्यात पाणी टाकू नका. याला तसच १० मिनिट झाकून ठेवा. जेणेकरून भाज्यांच्या पाण्यातच रवा चांगला मिक्स होईल.

१० मिनिटांनंतर एकदा बघा की रवा नीट एकजीव झाला आहे, नसेल झाला तर एकदोन चमचे  पाणी टाका आणि मग एकजीव करा. 

गरम तव्यावर थोडसं तेल टाका आणि मिश्रण पसरवा. हातानेच त्याला थोडं थोपटा आणि आकाराने मोठं करा. मध्यम आचेवर १५ मिनिटे शिजू द्या. मग दुसऱ्या बाजूनेही ५ मिनिटे चांगलं भाजून घ्या. लालसर झालं आणि थोडसं फुगून आलं की तयार.

 

     पोषक तत्वांच्या बाबतीत बटाटा हा अत्यंत समृद्ध कंदमुळ मानलं जातं. याच कारणामुळे बटाट्याला भाज्यांचा राजा मानलं जातं. कित्येक भाज्या किंबहुना सर्वच भाज्या बटाट्याशिवाय अपूर्णच वाटतात. बटाट्या मध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात आढळून येते. बटाटा हा प्रोटीन,लोह, कार्बोहाइड्रेट, व्हिटॅमिन ‘ए’, व्हिटॅमिन ‘ब’ आणि व्हिटॅमिन ‘क’ ने युक्त असतो. जेव्हा बटाटा क्रिम आणि चरबीयुक्त पदार्थांसोबत मिक्स करुन बनवला जातो तेव्हा यामध्ये फॅट वाढवण्याची क्षमता कित्येक पटीने वाढते.

    आपल्यातील भरघोस पोषक तत्वांमुळे बटाटा आपल्या केस आणि त्वचेचं सौंदर्य वाढवण्यास मदत करतो. सोबतच तुम्ही आपल्या आहारात बटाट्याचं सेवन वाढवू शकता. त्वचेचा रंग उजळ करणारे नॅचरल ब्लीचिंग एजंट्स बटाट्यामध्ये असतात. बटाट्यामध्ये अॅंटीएजिंग गुणधर्म असल्याने रिंकल्स टाळण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *