मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय जीवन प्रवास कसा | Mukhymantri Eknath Shinde |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय जीवन प्रवास कसा | Mukhymantri Eknath Shinde | 

 

एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्हयातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावचे, ठाण्यामध्ये बालपण आणि हे  शिवसेनेचे  नेते असून, सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या आधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ सालचा, प्राथमिक शिक्षण ठाण्यातील महानगरपालिकेच्या किसननगर शाळा  क्र. ३ मध्ये झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाण्यातील मंगला हायस्कूल मध्ये झाले. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्यावर  गरीब परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण  अर्धवट सोडावे लागले होते. कुटुंबाचा रथ पुढे चालविण्यासाठी त्यांनी वागळे इस्टेट परिसरात राहून ऑटोचालक म्हणून काम केले. वास्तविक एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला यावेळी सुरुवात केली.  पुढे कुटुंबाची आर्थिक घडी स्थिरावल्यावर त्यांनी आपले अर्धवट राहीलेले शिक्षणही पूर्ण केले. 

     वयाच्या अवघ्या सतरा आठराव्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. 

     आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यातीलच नव्हे तर नाशिक पर्यंत त्यांनी शिवसेनेचे जाळे विणले. आनंद दिघेना ते आपले गुरु मानतात. आजही त्यांच्या राजकीय यशाचे श्रेय ते आनंद दिघेंना देतात.

     नम्र मितभाषी, कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकरणाचे कौशल्य या एकनाथ शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत. २०१४ साली मोदी सरकारच्या लाटेतही शिंदेंनी ठाण्यात शिवसेनेची पडझड होऊ दिली नाही. कार्यकर्त्यांच म्हणणं ऐकून घेणारा नेता म्हणून शिंदेंची ओळख आहे. आनंदराव दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामध्ये शिंदेंच मोठ योगदान आहे. ठाणे पालिका, जिल्हा परिषद , अंबरनाथ नगर परिषद, कल्याण डोंबिवली पालिका, बदलापूर नगर परिषदेपासून अगदी नाशिक पर्यन्त शिंदे यांनी शिवसेनेचे जाळे विणले आहे. ठाण्यापासून नाशिकपर्यंत शिंदेंचा शब्द प्रमाण मानला जातो. 

     आपल्याला कदाचित माहीतही नसेल सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता.

     ठाण्याची वाटचाल खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे.

एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास

सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. 

     सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता त्यांनी  संपूर्ण जिल्हा आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते यांच्याशी  संपर्क ठेऊन पुढील मुहुर्तमेढ रोवली.  

     सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. 

     जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले.

     सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. सुमारे महिन्याभराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे जेमतेम महिनाभर या पदावर होते. 

     ठाण्यामधील त्यांचा लेखाझोका घ्यायचा तर ठाण्यातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास होणे गरजेचे होते, परंतु अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकार दुर्लक्ष करीत होते. अशा परिस्थितीत नगरसेवक असल्यापासून एकनाथ शिंदे यांनी या इमारतीतील रहिवाशांचे सुरक्षित घरांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष सुरू केला होता.  सन २००४ मध्ये आमदार झाल्यानंतर या धोकादायक अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना हक्काचे सुरक्षित घरकुल मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजनेचा पाठपुरावा केला. 

     पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑक्टोबर २०१३ रोजी ठाणे ते मंत्रालय असा भव्य मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले. परिणामी, २०१४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, ४ मार्च २०१४ रोजी क्लस्टर योजनेला मान्यता दिली.

      २०१४ मध्ये पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी इमारती अनधिकृत असल्या तरी या इमारतींमधले लोक मात्र अधिकृत आहेत.  अशी ठाम भूमिका घेऊन मा. उच्च न्यायालयाकडून या योजनेला हिरवा कंदील मिळवला. ठाण्यात किसन नगर परिसरासाठी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत आहे. वागळे इस्टेट, हाजुरी, लोकमान्य नगर, राबोडी, कळवा, मुंब्रा, दिवा अशा संपूर्ण महापालिका हद्दीत ही योजना राबवली जाणार आहे. 

     अनधिकृत इमारतींमधील पावणेतीन लाख कुटुंब, म्हणजेच किमान ८ ते १० लाख ठाणेकरांना हक्काचे सुरक्षित घर मिळणार मिळवून देण्याचे श्रेय आपल्या शिंदे साहेबांकडे जाते. रहिवाशांना मालकी हक्काचे घर मिळण्याबरोबरच जमीन मालकालाही मोबदला मिळणार आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत ग्रीन झोन्स, सार्वजनिक सुविधा यात वाढ होणार असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशस्त रस्ते होणार आहेत. अतिक्रमण झालेले तलावही मोकळा श्वास घेणार आहेत. योजनेत सहभागी होणाऱ्या अधिकृत इमारतींमधील रहिवाशांनाही २५ टक्के अतिरिक्त जागा या योजनेत मिळणार आहे. संपूर्ण ठाण्यात तब्बल १५०० हेक्टरवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून त्यामुळे ठाण्याला नव्याने नियोजनबद्धरित्या विकसित करण्याची अपूर्व संधी ठाणेकरांना मिळणार आहे.

     एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला.

• कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाट पॅटर्न तयार केला. आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी स्वतः संपूर्ण आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन मेळघाटाचा दोन दिवसांचा दौरा केला. आदिवासी विकास आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारीही सोबत होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कुपोषणमुक्तीचा आराखडा तयार केला असून अमलबजावणीला सुरुवातही केली आहे.

• गोरगरीब रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावे, यासाठी “बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून केंद्र सरकारने ६० दवाखान्यांना मंजुरी दिली आहे.

• तसेच, ठाण्यातील हाजुरी येथे गरिबांसाठी ठाणे महापालिका आणि जितो ही सेवाभावी संस्था संस्थेद्वारे  कॅथलॅब आणि डायलिसिसची सुविधा देखील सुरू केली.

• निती आयोगाने अलिकडेच जाहीर केलेल्या क्रमवारीत हेल्थ इंडेक्समध्ये एकनाथ शिंदे यांच्या योगदानामुळे राज्याचा तिसरा क्रमांक आला आहे.

     ठाणे शहर व जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, यासाठी स्वतंत्र धरण असलं पाहिजे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. एमएमआरडीएकडून प्रकल्पासाठी निधी मिळवला आणि १० वर्षांपासून रखडलेल्या काळू प्रकल्पाला गती दिली. २५०० एकर वनजमीन ताब्यात घेण्यासाठी एमएमआरडीए वन विभागाला २५९ कोटी देणार असून वन खात्याकडून जमीन ताब्यात आल्यावर कामाला सुरुवात होणार आहे.

     एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज शिवसेना नेतेपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *