मानवजात वाचवण्याची शेवटची संधी…
स्पेन मध्ये गेल्या आठवड्याभरात उष्णतेच्या लाटेमुळे पाचशे पेक्षा अधिक लोकं मेली. युरोपातील स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल, ग्रीस या देशाच्या जंगलात आग लागून हजारो हेक्टर जंगले जळून खाक झाली. या उष्णतेच्या लाटेमुळे ब्रिटन मध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली. पावसाळाच्या सुरवातीलाच विदर्भात अनेक जिल्हातील गावेच्या- गावे पाण्याखाली गेली. बिहार मध्ये गेल्या ४३ वर्षापासून दरवर्षी महापूर येतो आहे. आसाम तर महापुरात वाहून जाणे, हे नित्याचेच झाले आहे. गेल्या ४० वर्षांत ४०० टक्क्यांनी पुराचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये १४ जिल्ह्यांत कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण ६०० ते ९०० टक्क्यांनी वाढले आहे.
चक्रीवादळाची संख्या २०११ ते २०१९ या काळात ५२ % ने वाढली आहे. एवढच नाही तर भारतात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या एक वर्षाच्या काळात वीज पडण्याच्या तब्बल १.८५ कोटी घटना घडलेल्या आहेत. ज्या मागील वर्षापेक्षा ३४ % ने जास्त होत्या. भारतात वीज पडण्याच्या घटनामुळे २०२० या एका वर्षात २८६२ लोकांनी आपला प्राण गमावला आहे. महाराष्ट्रात जुलै २०२१ या एका महिन्यात दरड कोसळण्याच्या चक्क १०,००० घटना घडलेल्या आहेत. मागच्या तीस वर्षात अंटार्क्टिका खंडावर बर्फ वितळण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. हिमालयीन राज्यात सात महिन्यात २६ वेळा ढगफुटी होऊन प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.
अशा शेकडो घटना या जगात दरवर्षी घडत आहेत. दहा वर्षापूर्वी पर्यंत हवामान बदल, जागतिक तापमानवाढ हे एक थोतांड आहे, असा प्रचार केला जायचा. गेल्या काही वर्षातल्या या शेकडो घटनांनी हा प्रचार धुळीस मिळवला आहे. बऱ्याच लोकांना असही वाटायचं की, जागतिक तापमानवाढ फक्त अंटार्क्टिका खंडाला लागू आहे. तिकडे थोडासा बर्फ वितळतो आहे, बाकी त्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही. हवामान बदल हा अंटार्क्टिका पुरता राहणं हा आता इतिहास झालेला आहे आणि त्याचा भूगोल बदलला आहे. हवामान बदलाच्या घटना आपल्या देशात, शहरात, गावात होत आहेत. ज्याचा परिणाम हा फक्त कुठल्या तरी आफ्रिकेतल्या किंवा ब्राझीलच्या अमेझॉन जंगलावर होत नसून तो आपल्या घरादारावर आणि स्वतःवर होतो आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे मागच्या ३० वर्षात १,६६,००० लोकांनी आपला जीव गमावला. अशा प्रकारच्या उष्णतेच्या लाटेमुळे भारतात २०१५ साली २५०० लोकांचा प्राण गेला. या देशात गेल्या ६५ वर्षात वारंवार येत असलेल्या पुरामुळे एक लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. लाखो लोकं विस्थापित झाले. २०२१ या एका वर्षात पूर आणि चक्रीवादळामुळे भारतात ४९ लाख लोकं बेघर झाले. चालू वर्षात वेगवेगळ्या नैसर्गिक घटनामुळे ८८९ लोकांचे प्राण गेले आहेत. लाखो जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत, अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या नुसत्या नोंदी करायच्या म्हंटल तर त्याचाच एक ग्रंथ होईल.
हे दिसणारे नुकसान आहे, न दिसणाऱ्या नुकसानीचा प्रभाव तर अजून मोठा आहे. या हवामान बदलाच्या घटनामुळे पिकावर रोग पडण्याचे प्रमाण वाढले आहे. कापूस, डाळिंब, सोयाबीन, गहू अशा अनेक पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. भारतातील एकूण क्षेत्रापैकी ३० टक्के क्षेत्राचे वाळवंटीकरण झाले आहे. एका मुलाखतीत मुंबईतील मच्छीमार सांगत होते की, दहा- बारा वर्षापूर्वी एका वर्षात तीनशे दिवस मच्छीमारीचे काम चालायचे. आता ते काम खराब हवामानामुळे दोनशे दिवसावर आले आहे. या कारणामुळे गेल्या दहा वर्षात ५० टक्के मच्छीमारांनी आपला व्यवसाय सोडला आहे.
आपल्या देशात सरासरी दरवर्षी ११०० मिलिमीटर पाऊस पडतो. २००५ साली मुंबईत एका दिवसात ९५० मिलिमीटर पाऊस झाला होता. म्हणजे भारतात एका वर्षात जेवढा पाऊस पडतो, त्याच्या ८० टक्के पाऊस एका दिवसात एका शहरात पडला होता. मागच्या वर्षी चार दिवसांत सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या भागांत वर्षभर जेवढा पाऊस पडतो, त्याच्या २५ टक्के पाऊस एकाच दिवसात पडला होता. आता वर्ध्यात एका दिवसात १३६ मिमी पाऊस झाला. देशातील सर्वाधिक पाऊस मेघालयमधील चेरापुंजी या ठिकाणी होतो. गेल्या तीन वर्षांत महाबळेश्वरने चेरापुंजीला मागे टाकले आहे. आता रत्नागिरी चेरापुंजीला मागे टाकते आहे. कमी वेळात प्रचंड पाऊस पडल्याने पूर येण्याची शक्यता प्रचंड वाढते. तेच गेल्या काही वर्षांत आपण पाहत आहोत. गेल्या १०० वर्षांत भारतातील तापमान १.२ सेल्सिअसने वाढलेले आहे. तापमान वाढल्याने बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. समुद्राचे बाष्पीभवन वाढले आहे. त्यामुळे ढगफुटीचे, कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
या प्रचंड उलथा- पालथीच्या काळात सरकार अशा पद्धतीने काम करत आहे की, जणू काहीच घडलेलं नाही. निवडून गेलेल्या खासदार- आमदारांना आपल्या भागाची चांगली जाण असते, असं म्हणतात पण या खासदारांनी गेल्या २० वर्षात हवामान बदलावर फक्त ०.३ टक्के प्रश्न विचारले आहेत. भारतात खंडीभर राजकीय पक्ष आहेत पण एकही पक्ष हवामान बदलाच्या विषयावर अवाक्षरही काढताना दिसत नाही. एकाही पक्षाच्या जाहीरनाम्यात हवामान बदल हा विषय नसतो. महापुराच्या नावावर मात्र काहीही विधाने केली जातात. काही दिवसापूर्वीच तेलंगानाचे मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील पुरामागे विदेशी लोकांचा हात आहे. अजूनही अशी वेडसर वक्तव्ये केली जात आहेत.
अशा परिस्थितीत हवामान बदलाच्या घटनांना गंभीरपणे कोण घेणार? देशातील जनता तर भोंगे, बुरखा, लव्ह जिहाद यात गुंग झाली आहे. इथल्या बहुसंख्याक जनतेला बुलडोझरने मुसलमानांची घरे पाडली तर त्याचा आनंद होतो आहे. बुलडोझर बाबा, बुलडोझर मामा नावाने मुख्यमंत्री प्रसिद्ध होत आहेत पण नदीच्या पात्रातील अतिक्रमण काढताना, गाळ काढताना बुलडोझर दिसत नाहीत. आसाम मध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली अनेक सामान्य लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवला गेला पण त्या बुलडोझरचे ब्रह्मपुत्रा नदीपात्रातील अतिक्रमण काढण्यास प्राधान्य दिसले नाही.
सरकार एका बाजूला धर्म, जात, निवडणुका आणि राज्या-राज्यातील सरकारे पाडण्यात मग्न आहे तर देश दुसऱ्या बाजूला पुरात बुडतो आहे, उष्णतेने होरपळून निघतो आहे, चक्रीवादळात फसतो आहे, दुष्काळात मरतो आहे. हवामान बदलास जबाबदार असणाऱ्या देशातील सत्ताधारी व उच्चवर्गावर महापूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटाचा परिणाम होत नाहीये. ते अजून सुपात आहेत. या घटनामुळे तर शेतकरी भरडला जातोय. शेतमजूर देशोधडीला लागतोय. कामगार वीज पडून मारतोय. उष्णतेच्या लाटेने सामान्य माणूस होरपळतोय.
सामान्य जनतेने हवामान बदलाच्या मुद्द्यावर रान पेटवून सरकारला कृती करण्यास भाग पाडण्याची गरज आहे. नाहीतर आपला विनाश अटळ आहे, हे समजावे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयपीसीसी अहवालात सांगितले आहे की, जगाचे तापमान १.५ सेल्सिअस पुढे आपल्याला जाऊ द्यायचे नाही. ते गेले की विनाशापासून आपल्याला कोणी रोखू शकणार नाही. औद्यगिक क्रांती झाल्यापासून आतापर्यत एक सेल्सिअस तापमान आधीच वाढलेलं आहे. ज्या हरितगृह वायुमुळे तापमानात वाढ होते, त्याचे हवेतील प्रमाण वर्षागणिक प्रचंड वाढत चाललेलं आहे. या हरितगृह वायुमुळे १९९० च्या तुलनेत २०२१ पर्यंत ४९ % ने तापमान वाढले आहे. असेच चालू राहीले तर येत्या तीस वर्षातच देशातील ७८ शहरे आणि जगातील अनेक देश पाण्यात बुडण्याची शक्यता आहे. आता जन्मलेली मुलं चाळीशी सुद्धा पार करू शकणार नाहीत. पाणी आपल्या नाकापर्यंत आलेलं आहे, ही लढाई जगण्या- मरण्याची झालेली आहे. मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. आता काही केलं नाही तर आपला डायनासोर झाल्याशिवाय राहणार नाही.
जगात आज बहुतांश लोकं मानायला लागले आहेत की, या घटना हवामान बदलामुळे घडत आहेत. जी चांगली गोष्ट आहे पण जेव्हा उपायावर चर्चा केली जाते. तेव्हा लोकांनी झाडे लावा, झाडे जगवा, प्लास्टिक वापरू नका, सायकल वापरा असे सल्ले दिले जातात. हे करणे चांगले आहे पण यामुळे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या हवामान बदलाच्या घटना काही थांबणार नाहीत. पंचवीस- तीस वर्षापूर्वी असे उपाय केले गेले असते तर कदाचित याचा परिणाम झाला असता पण आता काही होणार नाही. तत्परतेने लाखो लोकांनी झाडे लावले तरी ते झाडे मोठे होण्यास तीस- चाळीस वर्षाचा कालावधी लागेल. दुसऱ्या बाजूला मोठ्या कंपन्या दर तासाला लाखो झाडे तोडत आहेत. कारखाने प्रदूषण करत आहेत.
मानवजात वाचवायची असेल तर आपल्याला विकासाचे मॉडेल बदलावे लागेल. सध्याचे जे मॉडेल आहे, त्याचे दोन मोठे घातक परिणाम होत आहेत. पहिले म्हणजे कच्चा माल मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात आहे. देशातील बहुतांशे खनिजे जंगल भागात आहेत. ती मिळवण्यासाठी जंगले नष्ट केली जात आहेत. उदा. मध्य प्रदेशातील बक्सवाहा जंगलातील हिरे काढण्यासाठी दोन लाख पंधरा हजार झाडे तोडली जाणार आहेत. हजारो हेक्टर जंगल नष्ट केले जात आहे. विकासाच्या नावाखाली नद्या, डोंगरांना हानी पोहचवली जात आहे तर दुसऱ्या बाजूला मोठे- मोठे उद्योग उभारले आहेत. ज्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनाओक्साईड इ. तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरणारे घटक आपण वातावरणात सोडत आहोत. घातक रसायने नदीत सोडून नद्याही प्रदूषित केल्या जात आहेत. या विकासाच्या मॉडेलने निसर्गाला ओरबाडून अनेक प्रकारच्या चंगळवादी वस्तू बनवल्या. ज्या चंगळवादी वस्तूंनी बाजार ओसंडून वाहत आहेत.
आपल्या मुला-मुलींना ही पृथ्वी राहण्याजोगी ठेवायची असेल तर ही ओरबाडणारी संस्कृती सोडावी लागेल. शहर केंद्रित मोठ्या उद्योगापेक्षा विकेंद्रित असे गाव- खेड्यात विखुरलेले पर्यावरण पूरक लहान- लहान उद्योग उभे करावे लागतील. पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना तिलांजली द्यावी लागेल, सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगल्या दर्जाची व स्वस्त करावी लागेल. अशा उपायांनीच हवामान बदल रोखता येऊ शकेल.